‘..तर मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत?’, आठवलेंचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? अशी चर्चाही रंगू लागली आहे. यावर बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल शनिवारी स्पष्टीकरण दिले होते. भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, त्यामुळे या चर्चांमध्ये अर्थ नाही, असा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, मलिक यांच्या स्पष्टीकरणानंतर रिपाईंचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूचक विधान केले आहे. ‘शिवसेना आणि काँग्रेस देखील वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. पण आज ते सोबत आहेत. मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं देशाचं संविधान विविध विचारांच्या लोकांना एकत्र आणणारे आहे’, असेही आठवले म्हणाले.

काय म्हणाले होते नवाब मलिक?
पवार-मोदी भेटीनंतर मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेली ते म्हणाले की. ‘भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नदीच्या दोन टोकांप्रमाणे आहेत. जोपर्यंत नदीमध्ये पाणी असतं, तोपर्यंत नदीची दोन टोकं कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. भाजप व राष्ट्रवादीचंही तसंच आहे. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे. असं असताना हे दोन्ही पक्ष एकत्र येणं शक्य नाही. त्यामुळं याबाबतच्या चर्चांमध्ये तथ्य नाही,’ असं मलिक यांनी स्पष्ट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या