‘…तर आदेश धुडकावून आम्ही आमची दुकाने सुरु करू’, व्यापारी संघटनांचा सरकारला इशारा

lockdown

पुणे – राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

या शासनाच्या निर्णयाला विरोध होत असून अनेक व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक या निर्णयाला विरोध करत आहेत.दरम्यान, हा निर्णय येत्या 24 तासात न बदलल्यास तो आदेश धुडकावून आम्ही आमची दुकाने सुरु करू, असा इशारा महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांनी दिला आहे.

राज्य शासनाने सोमवारपासून नव्यानं जारी केलेल्या निर्बंधानुसार शनिवार आणि रविवारी संपूर्ण टाळेबंदी राहणार असून सोमवार ते शुक्रवार या काळातही रात्री 8 वाजेपर्यंत केवळ जीवनावश्यक दुकानांनाच परवानगी दिली गेली आहे. पुणे विभागात कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी हा आदेश धुडकावून आपली दुकाने सुरूच ठेवली असून आता अन्य जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी मराठा चेंबरच्या नेतृत्वाखाली या निर्णयाविरुद्ध इशारा दिला आहे.

दरम्यान,एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला दिवसेंदिवस कोरोना रुग्णवाढ झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,15,736 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याआधी 5 एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक रुग्णवाढ झाली होती.

यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात 97 हजार 894 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने हा नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या