‘…तर कांचन कुल यांचा प्रचार आम्ही करणार नाही’

blank

टीम महाराष्ट्र देशा – जर आमच्या उमेदवारांना तुम्ही सहकार्य केले नाही तर दौंडमध्ये भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार करणार नाही असा इशारा शिवसेनेच्या बैठकीत देण्यात आला. पुणे जिल्ह्यातील काही लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना उमेदवारांना सहकार्य केले जात नाही असा आरोप दौंड तालुका शिवसेनेने केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती असताना पुणे जिल्यातील शिरूर आणि मावळ येथे भाजपचे शिवसेनेला सहकार्य मिळत नाही असा आरोप या बैठकीत करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते दौंडमध्ये भाजपला सहकार्य करणार नाहीत असा पवित्रा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

बारामतीतून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. आता कांचन कुल यांची थेट लढत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत होणार आहे.

कांचन कुल यांचा अल्पपरिचय

कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. कांचन कुल यांचे शिक्षण बारामतीत झाले असून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. पद्मसिंह पाटील हे कांचन यांचे चुलते आहेत तसेच उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत असलेले राणा जगजितसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. २००५ साली त्यांचा राहुल कुल यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या.