…तेव्हा आम्ही सत्तेला लाथ मारू – शिवसेना

राणे जेव्हां मंत्रिमंडळात प्रवेश घेतील; तेव्हां मारेल शिवसेना सत्तेला लाथ

कणकवली: नारायण राणे जेव्हां मंत्रिमंडळात प्रवेश घेतील तेव्हां शिवसेना सत्तेला लाथ मारेल. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा कणकवली विधानसभा मतदारसंघ मर्यादित निर्धार मेळावा आज येथील मातोश्री मंगल कार्यालयात झाला. तेव्हा शिवसेनेचे नेते मंडळी बोलत होते.

नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेसाठी ऑफर स्वीकारली असून येत्या १२ तारखेला राणे राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत

काय म्हणाले शिवसेनेचे नेते?

सुभाष देसाई

”राणेंनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला आहे. त्यांना शिवसेना कधीच माफ करणार नाही. तसेच राणे केंद्रात जावोत अथवा राज्यात, जेथे जातील तेथे त्यांना भुईसपाट करण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. राणेंनी आपल्या पक्षाचे नाव स्वाभिमान ऐवजी स्वार्थाभिमान ठेवायला हवे.”

एकनाथ शिंदे

”काही मंडळींनी शिवसेना संपवायला निघाली होती. पण कुडाळ आणि बांद्राच्या जनतेने त्यांनाच धूळ चारली. त्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही.”

विनायक राऊत
”राजकीय अस्तित्व संपलेल्या राणेंना रिफायनरी आंदोलनाचा आधार घ्यावा लागला. पण ज्यांनी औष्णिक प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला. तेथील जनतेला मारहाण केली. अणुऊर्जा प्रकल्प आणण्यातही महत्वाची भूमिका बजावली. त्या राणेंचे रिफायनरी विरोधातील आंदोलन हे पुतना मावशीचे प्रेम आहे.”