‘..तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर गंगामय्याचा कोप नक्कीच होणार!’, वारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची टीका

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारकऱ्यांना घरातूनच पांडुरंगाचे दर्शन घ्यावे लागत आहेत. यंदाही राज्य सरकारने वारीला बंधन घातले असून मानाच्या १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली. त्यावरुन, भाजपा नेत्यांनी वारीसाठी आग्रह धरला आहे. ‘सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान मोदीपर्यंत सगळ्यांचेच म्हणणे आहे की कोरोनाचे नियम पाळा. तिसऱ्या लाटेपासून सावध राहा. पण महाराष्ट्र भाजपचे राजकारण दुसऱ्या टोकाचे. ते सुप्रीम कोर्ट व पंतप्रधानांनाही जुमानत नाहीत असे दिसते,’ असा खोचक टोला शिवसेनेने ‘सामना’मधून लगावला आहे.

‘भाजप पंढरपूरच्या वारीला परवानगी द्या असे टुमणे ते लावत आहेत व वारकरी संप्रदायातील काही जाणत्या मंडळींना भरीस घालून वाढीसाठी आंदोलने घडवीत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळण्याचे हे अघोरी प्रकार आहेत,’ अशी टीका सामनातून केली आहे.

‘पंढरपूरची वारी असेल, नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा, भक्तांचे प्राण महत्त्वाचे आहेत. देवाच्या दरबारात राज्यकर्त्यांना जाब द्यावा लागेल. भारतीय जनता पक्षाची तडफड आणि तगमग आपण समजू शकतो. त्यांना फक्त लोकांची डोकी भडकवून राजकारण करायचे आहे. सुप्रीम कोर्टापासून पंतप्रधान मोदीपर्यंत सगळ्यांचेच म्हणणे आहे की, निर्बंध पाळा. तिसऱ्या लाटेपासून सावध राहा, पण महाराष्ट्र भाजपचे राजकारण दुसऱ्या टोकाचे. ते सुप्रीम कोर्ट व पंतप्रधानांनाही जुमानत नाही असे दिसते. गंगेच्या प्रवाहात श्रद्धाळूंचे मृतदेह वाहातच राहावेत, हीच त्यांची भावना असेल तर गंगामय्याचा कोप अशा लोकांवर झाल्याशिवाय राहाणार नाही.’

‘पंढरपूरची वारी हा जसा श्रद्धेचा विषय आहे तसे उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये कावड यात्रेचे महत्त्व आहे. आता त्याच श्रद्धांचा मान ठेवून भाजपचे लोक कावड यात्रेला परवानगी द्या नाहीतर आंदोलन करु, अशा धमक्या देणार आहेत का? ही धमकी एकतर सर्वोच्च न्यायालयाला असेल नाहीतर थेट पंतप्रधान मोदींनाच असेल, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी त्यांनी कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा अनुभव आणि शहाणपण आहे. मग धामी हिंदुविरोधी आहेत असा ठपका ठेवून धामींना हाकला अशी मागणी कोण करणार आहेत काय?,’ असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या