… तर युतीच्या ११ आणि आघाडीच्या २७७ जागा निवडून येतील – अमोल मिटकरी

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी बल्लारपूर येथे ही यात्रा आली होती. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ‘काही दिवसापूर्वी चांद्रयान सफल झाले नाही, यावर पंतप्रधान मोदी रडले. पण मोदी रडले ते केवळ ३७० नंतरचा मुद्दा गेला याकरिता. भिडे गुरुजी सांगतात एकादशीला यान उडवले असता सफल झाले असते. पण सरकार गड-किल्ले भाड्याने देण्याचे जाहीर करत आहेत, यावर काहीच बोलत नाहीत असं विधान केले.

पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही मात्र रशियाला हजारो कोटींचे कर्ज देण्याची ताकद कशी काय आहे? असं प्रश्न उपस्थित केला. तसेच पक्षाची निष्ठा सोडली की लोकांना ढोलकी वाजवण्याची वेळ आली आहे. जे पक्षाशी निष्ठावंत आहेत आणि जे संकटाच्या काळात साथ सोडत नाहीत तेच इतिहास घडवतात. जर बॅलटवर निवडणूक घेतली तर या सरकारच्या केवळ ११ जागा येतील. आणि आघाडीचे २७७ जागा येतील यात शंकाच नाही असं विधान केले आहे.

दरम्यान, याच सभेत अमोल कोल्हे यांनी आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी या सरकारची अवस्था आहे अशा शब्दात सरकारवर टीका केली. तसेच रुपाली चाकणकर यांनीही सरकारवर सडकून टीका केली. या सभेला जयंत पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग, मेहबूब शेख, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.