… तर ‘अरविंद पाटील निलंगेकर’ माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने ‘आमदार’ म्हणून निवडून येतील !

टीम महाराष्ट्र देशा (प्रा.प्रदीप मुरमे) निलंगा विधानसभा मतदारसंघातून अरविंद पाटील निलंगेकर यांनी निवडणूक लढविली तर ते माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येवून आमदार होतील असे वक्तव्य राज्याचे कौशल्य विकास तथा कामगार मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.निमित्त होते निलंगा (जि.लातूर) येथील जिजाऊ ग्रंथालय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचे.उपस्थित जनसमुदायासमोर यावेळी बोलताना संभाजीराव पाटील यांनी आपले लहान बंधू युवा नेते अरविंदराव यांच्या कामाचे मोठे कौतुक केले.भावाप्रती बोलताना ना.निलंगेकर कमालीचे भावूक झाले होते.अरविंद व त्यांची टीम मतदारसंघात सक्षमपणे काम करत आहे.मतदारसंघातील जनतेच्या विविध समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.

अरविंद व त्यांच्या सारखे अनेक कार्यकर्ते झिजत असल्यामुळेच आपण राज्यभर फिरु शकत आहोत व मंञी म्हणून यशस्वीपणे धुरा पार पाडत आहे.अरविंद व त्यांच्या टीम मधील अनेक जिवा – भावाचे कार्यकर्ते माझ्या सोबत सदैव सावलीप्रमाणे उभे आहेत असे म्हणून संभाजीराव यांनी अरविंद व त्यांच्या टीमचे तोंडभरुन कौतुक केले.ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर अरविंद माझ्यापेक्षा लोकप्रिय आहे हे सांगायला देखील विसरले नाहीत.अरविंद निवडणूक लढविल्यास माझ्यापेक्षा जास्त मताने ते निवडून येतील असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.परंतु लागलीच ते कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचा पुनरुच्चार देखील केला !

दरम्यान, मागील २-३ दिवसापासून राजकीय जाणकारांमध्ये माञ संभाजीरावांच्या त्या वक्तव्याच्या अनुषंगाने मतदारसंघात जोरदार चर्चा झडत आहे.त्या वाक्याचा राजकीय जाणकार माञ आपआपल्या सोयीनुसार अर्थ काढताना दिसत आहेत.निवडणूक लढविणार नाही याचा अर्थ काहीजण नेमका उलट घेत आहेत.कारण राजकारणी मंडळीच्या ओठात एक असतं तर पोटात नेमकं वेगळं असतं.संभाजीराव पाटील हे मराठवाड्यातील एक धूर्त राजकारणी आहेत.आपण आपल्या भावाला विधानसभा निवडणूकीत निवडून आणू शकतो असा विश्वास त्यांच्या ठायी आहे.

त्यामुळे अरविंदराव यांना ते आगामी विधानसभेच्या फडात उतरवतील व स्वतः माञ उस्मानाबाद मार्गे दिल्ली गाठतील असा एक मतप्रवाह आहे.दुसरा एक मतप्रवाह म्हणजे संभाजीराव दिल्लीला न गेले तर निलंगा तालुक्यातील ६२ गावे असलेल्या शेजारच्या औसा विधानसभा मतदारसंघातून अरविंद पाटील निलंगेकर निवडणूकीला उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही,असा अर्थ काही जाणकार लावत आहेत.एकुणच निवडणूक लढविणार नाही म्हणणारे अरविंद पाटील निलंगेकर आगामी विधानसभा निवडणूकीत निलंगा किंवा औसा मतदारसंघातून शड्डू ठोकल्यास सामान्य कार्यकर्त्यांनी काही आश्चर्य वाटून घेवू नये. शेवटी आपली राजकीय चाल सामान्य कार्यकर्त्याच्या लक्षात येवू देतील तर ते नेते कसले असे म्हंटल्यास काही वावगे ठरणार नाही,हे माञ निश्चित !