मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल, ‘नेरी’ गावातील युवकांनी घातला नवीन आदर्श

जळगाव: आजच्या पिढीला मराठी शाळा म्हटलं की कमी पणा वाटायला लागला आहे, याच मराठी शाळेत शिकलेल्या लोकांना सुद्धा आपली मुलं मराठी शाळेत शिकायला टाकण्याची लाज वाटत आहे. म्हणून इंग्रजी शाळांचे महत्व दिवसेंदिवस वाढतच जात आहे परंतु आजही बहुतांशी लोक असे आहेत की ज्यांना आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतील शिक्षण देणे परवडणारे नाही, आशा परिस्थिती शासनाने देखील मराठी शाळेकडे जणू काही दुर्लक्षच केले आहे.

परंतु या काळातही काही तरुणांनाच्या पुढाकाराने ‘नेरी’ या गावातील मराठी शाळेला जीवनदान मिळत आहे, जिल्हा जळगाव जिल्ह्यातील नेरी तालुक्यातील मराठी शाळा मरणासन्न झाली आहे. या शाळेत शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या युवकांना एकत्र करण्याचं काम गावातील ‘बबलू पाटील’ या युवकाने केले.

जेव्हा बबलू यांनी गावातील शाळेत जाऊन शाळेच्या स्थितीबद्दल जाणून घेतले तेव्हा शिक्षकांनी सांगितले की आम्ही प्रशासनाकडे या विषयी अर्ज विनंत्या केल्या आहेत, परंतु आम्हाला त्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा बबलू यांनी स्वतः गावातील युवकांना प्रोत्साहित करून शाळेची परिस्थिती लक्षात आणून दिली. सर्व जण याच शाळेत शिकलेले असल्याने सर्वांनी आपल्या आपल्या कुवतीनुसार पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. पैसे जमा ही झाले, परंतु गावातीलच काही जुन्या जाणत्या राजकीय लोकांनी यांच्या या चांगल्या कमला विरोध केला.
त्यातून मार्ग काढण्यात बबलू पाटील आणि त्यांचे सहकारी गणेश इधाटे, बापू धणगर, विनोद कुमावत, गौतम जैन, मनोज खोडपे, कुंदन भदाने, आशीष दामोदर, ज्ञानेश्वर भिल, रमेश कोळी, नारायण कुमावत इत्यादी युवकांनी शेवटी यश आले आहे आणि शासनाच्या मदतीची वाट न पहाता गावातील शाळेचे नूतनीकरण करण्याचे काम या तरुणांनी हाती घेतले आहे.

महाराष्ट्र देशाशी बोलताना बबलू पाटील यांनी सांगितले की, शासन दरबारी आम्ही मदतीसाठी अर्ज करून ही आम्हाला जेव्हा मदत मिळाली नाही तेव्हा आम्ही हा निर्णय घेतला ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’ या म्हणीचा खरा अर्थ देखील आम्हाला याच कामानिमित्त आला. बबलू पुढे बोलताना म्हणाले की, आपण ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेमुळे आपल्याला नाव मिळालं त्या शाळेचे ऋण फेडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. जिथं कुठं असल्या शाळा असतील तेथील युवकांनी आपल्या शाळेसाठी पुढं येऊन काम करावं असं बबलू पाटील यांनी सांगितलं. कारण मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल अन्यथा मराठी भाषेला भविष्यातील काळ खडतर असेल.