अल्पसंख्याक मंत्रालयाच्या उदासीनतेमुळे हज हाऊसचे काम आजपर्यंत अपूर्ण; खा. जलील यांनी व्यक्त केली नाराजी!

अल्पसंख्याक मंत्रालयाच्या उदासीनतेमुळे हज हाऊसचे काम आजपर्यंत अपूर्ण; खा. जलील यांनी व्यक्त केली नाराजी!

imtiyaz jaleel

औरंगाबाद : हज हाऊसचे बांधकाम काम सुरु करण्यासाठी २०१३ मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली होती. परंतु अल्पसंख्याक मंत्रालयाच्या उदासीनतेमुळे वेळेवर निधीची उपलब्धता न झाल्याने आजपर्यंत हज हाऊसचे काम अपुर्णच आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर जास्तीत जास्त ३ वर्षात बांधकाम पुर्ण होणे अपेक्षित होते. ८ वर्षे झाल्यानंतरही काम प्रलंबितच असल्याने बांधकामाच्या साहित्यात व कामाच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने मंजुर निधीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. २९ कोटींचा प्रकल्प आता ४४ कोटींवर गेला आहे. हज हाऊसच्या बांधकामाची गुरुवारी (दि.२८) खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सिडकोच्या मुख्य प्रशासक दिपा मुंडे व इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संयुक्तरित्या पाहणी झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी दोन महिण्यात हज हाऊसचे उद्घाटन करण्याचे नियोजन करत असुन त्याकरीता प्रलंबित असलेल्या कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. पाहणी दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, शासनाच्या वतीने आजपर्यंत देण्यात आलेल्या निधीतुन हज हाऊसचे फक्त बांधकाम पुर्ण होणार आहे.

मराठवाड्यातुन हज यात्रेसाठी जाण्याकरिता भाविक येथे येणार असल्याने त्यांना सोयीसुविधा पुरविणे अत्यावश्यक आहे. याठिकाणी निधीच्या अभावामुळे संपुर्ण इंटेरिअर व सोयीसुविधांची कामे प्रलंबित राहणार असल्याने नविन सुधारित अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवले आहे. मात्र आजपर्यंत ते प्रलंबितच असल्याने खासदार जलील यांनी नाराजी व्यक्त केली. सुधारित अंदाजपत्रकाला मान्यता न मिळाल्यामुळे प्रशासकीय कार्यालय साहित्यासहित, सर्व फर्निचर, ऑडिटोरिअम हॉल, बैठक व मुक्कामाच्या सुविधेचे सर्व साहित्य, साऊंड सिस्टीम, उर्दु हॉल व प्रार्थना घरातील साहित्य, व्हिआयपी रुम्स मधील सुविधा, टेरेस गार्डन, फाउंटन, मुघल आर्किटेक्चर इफेक्टस यांसारखी कामे प्रलंबितच असल्याचे जलील यांनी सांगितले.

दोन महिन्यात उद्घाटन करणार

अल्पसंख्याक मंत्रालयात सुधारित अंदाजपत्रक प्रलंबितच असल्याने हज हाऊसची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतुन निधीची मागणी करण्यात आली असुन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या