तेलगाव कोविड केअर सेंटरचे काम अपूर्णच; महिना उलटला तरी कासव गतीने काम

बीड: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील तेलगाव येथील ट्रामा केअर युनिटमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता याला एक महिना उलटला असला तरी देखील अजूनही कोविड केअर सेंटरचे काम पूर्ण झालेले नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयांमध्ये खाटा तसेच वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र तयार झाले आहे. याच पार्श्वभूमीवर तेलगाव येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचे सांगण्यात आले होते मात्र हे काम अगदी कासव गतीने सुरु आहे.

धारूर तालुक्यातील तेलगाव येथील ट्रामा केअर युनिटमध्ये चालु करण्यात येणाऱ्या नियोजित कोविड सेंटरमधील अंतर्गत लाईट फिटींगची कामे अंत्यत धिम्या गतीने होत आहे. कोविड सेंटर चालु होण्यास उशिर होत असल्याचे दिसुन येते. याबाबत पालकमंत्र्यांनी गंभीरतेने याची दखल घेऊन, कोविड सेंटर चालु करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी तेलगाव व परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंकडे केली आहे.

धारुर तालुक्यातील तेलगाव येथे असलेली ट्रामा केअर युनिट इमारत सुस्थितीत असूनही या ठिकाणी कोविड सेंटर तयार केले गेले नव्हते. ऑक्सिजन पाइपलाइ असलेले बेड उपलब्ध असूनही ही इमारत वापराअभावी पडली होती. एकीकडे जिल्ह्यात कोरोना रुग्णांना साधे बेड, ऑक्सिजन बेड मिळत नाही. धारुर, माजलगावच्या रुग्णांना अंबाजोगाईला जावे लागते अशी स्थिती असताना दुसरीकडे तेलगाव येथील सर्व सोयी सुविधा असलेली इमारत धुळखात असल्याने इथे कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती.

केवळ लाईटची कामे झाले नसल्याने हे कोविड सेंटर चालु करण्यासाठी उशिर होत असल्याचे सांगण्यात येते. याबाबत लाईटची कामे करणाऱ्या संबंधित गुत्तेदारास कडक ताकीद देऊन, त्यास तातडीने लाईटची कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. जर सदर गुत्तेदार हलगर्जीपणा करत असेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. असे नागरिकांनी म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देऊन गतीने हे काम करुन तत्काळ कोविड सेंटर कार्यान्वित करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP