पंकजा मुंडे यांचे ‘ते’ शब्द अखेर खरे ठरले

बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने मतमोजणी घेण्यात आली आहे. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.

नुकत्याच गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी पंकजा मुंडे या भाषणाला सुरुवात करताना उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी सुरेश धस याचं स्वागत करताना भावी आमदार सुरेश धस असं म्हणत स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतानंतर धस यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. प्रेक्षकांनी देखील धस यांच्या या उल्लेखला भरभरून दाद दिली.आज धस यांच्या विजयाने मुंडे यांनी केलेला तो उल्लेख खरा ठरला.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ४ थ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार उदयनराजे भोसले,खासदार संभाजीराजे भोसले,सहकारमंत्री सुभाष देशमुख,सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते.

बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक पहिल्यापासूनच चुरशीची राहिली होती. सर्वप्रथम अधिकृत उमेदवार कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा दणका बसला होता. त्यानंतर आता धस यांच्या विजयाने विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना बहीण पंकजा मुंडे आणि धस यांनी धोबीपछाड दिल्याचं बोललं जातं आहे. मताची आकडेवारी कमी असताना देखील काँग्रेस – राष्ट्रवादीची मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. दरम्यान धस यांना 526 मत, जगदाळे यांना 452 , 1 मत नोटाला तर 25 मते बाद झाली.

You might also like
Comments
Loading...