महिला हॉकी संघाला पदाची हुलकावणी, कांस्यपदकाच्या सामन्यात ब्रिटनकडून पराभव

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास संपुष्टात आला आहे. उपांत्य फेरीच्या पराभवानंतर कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनकडून देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत एक दिवसापुर्वीच भारतीय हॉकी पुरुष संघाने कांस्यपदकाच्या लढाईत जर्मनीला नमवत ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक पदक पटकावले होते. यानंतर सर्व क्रीडा रसीकांच्या नजरा या महिला हॉकी संघाच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. मात्र ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच पदकाची आशा घेऊन खेळणाऱ्या महिला हॉकी संघाला या सामन्यात ब्रिटनकडून ३-४ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पहिल्या सत्रात एकही गोल होऊ शकला नाही.

मात्र दुसऱ्याच सत्रात पहिल्या ३० सेंकदात ब्रिटनने गोल करत सामन्यात आघाडी मिळवली. काही वेळातच आणखी एक गोल करत ब्रिटनने आघाडी २-० अशी केली. यानंतर भारताकडून गुरजीत कौरने गोल करत भारताला सामन्यात परत आणले. यानंतर पेनल्टी कॉर्नरवर भारताने गोल करत बरोबरी साधली. यानंतर भारतीय स्टार खेळाडू वदंना कटारीयाने एक गोल करत भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात ब्रिटनने एक-एक गोल करत ३-४ अशी आघाडी घेतली. या सामन्यात जरी पराभव झाला तरी भारतीय संघाने इथपर्यंत धडक मारत कौतुकाची थाप मिळवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या