कर्नाटकात जो पक्ष सत्तेवर येईल तोच पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत बाजी मारेल – रामदेव बाबा

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी १२ मेला मतदान झालं होतं. दरम्यान आज या निवडणुकीचा निकाल आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बाबा रामदेव यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलंय, जो कर्नाटक विधानसभा निवडणूक जिकेलं तोच लोकसभा निवडणुकीत बाजी मारेल असं रामदेव बाबा यांनी म्हंटल आहे.

कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल. कारण, जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल असे त्यांनी म्हटले आहे. रामदेव बाबा यांचे हे विधान यासाठी महत्वाचे मानले जात आहे कारण, त्यांच्यावर कायम भाजपाची मेहरबानी असल्याचे आरोप केले जातात. २०१४च्या निवडणूकांपूर्वीही रामदेव बाबा यांनी भाजपाचे उघड समर्थन केले होते. त्यांच्या या भाकितामागे मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांचा संदर्भही असू शकतो.

कर्नाटकच्या आज येणाऱ्या निकालानंतर राज्यात कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होईल. मात्र, त्यानंतर वर्षभरानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक सेमी फायनल मानली जात आहे. या निवडणुकीत ज्या पक्षाची कामगिरी चांगली असेल तोच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावेदार असेल. कारण, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आपली सर्व शक्ती या निवडणुकीसाठी पणाला लावली होती. तसेच काँग्रेसकडून देखील प्रचारात कुठलीही कसर ठेवण्यात आली नव्हती.