fbpx

कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठरणार

Ranjit Patil

मुंबई – विवाहानंतर अनेक जाती आणि जमातींमध्ये मुलीचे कौमार्य चाचणी करण्याची अनेक प्रथा वर्षापासून आहे. या चाचणीला कंजारभाट समाजातील अनेक मुलींना सामोरे जावे लागते आहे. गेल्या कहो दिवसांपूर्वी या संदर्भातील काही बातम्याही समोर आल्या होत्या. अशा घटना वारंवारहोऊ नये म्हणून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जात पंचायतीविरोधी समितीचे सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठरणार असून लवकरच यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसेच तसे संबंधित पोलीस ठाण्यांना कळवले जाणार असल्याची माहिती दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत दर महिन्याला महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाईल असे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्त्रियांसाठी कौमार्य चाचणी अपमानजनक असून अशी चाचणी घेणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली. गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात अशा घटना घडू नयेत आणि घडल्यास संबधितांवर गुन्हा नोंदवण्यात यावा अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.