fbpx

दानवेंनी केली निवडणूक आयोगाची दिशाभूल ? पदवीबद्दल दिलेल्या माहितीत अजब तफावत

टीम महाराष्ट्र देशा : जालना लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार खा. रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आक्षेप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांनी निवडणूक अधिकार्यांकडे दाखल केला होता. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दानवे यांनी 2011 या वर्षी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे नमूद केले होते. यावेळी अर्ज दाखल करताना मात्र त्यांनी शैक्षणिक पदवी 2012 या वर्षी घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, दानवे यांनी नेमकी कोणत्या वर्षी पदवी प्राप्त केली, असा आक्षेप वानखेडे यांनी घेतला आहे. मात्र, शपथपत्रात नमूद माहिती बाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमचा नाही, असे सांगून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी डॉ. वानखेडे यांचा आक्षेप फेटाळून लावल्याचे समजते. याबाबत वानखेडे लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना रावसाहेब दानवे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार सुद्धा भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सभापती हरिभाऊ बागडे व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आचारसंहिता भंग केल्याचे डोके यांचे म्हणणे आहे. या बाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत डोके यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने 100 मीटर अंतरावर वाहने थांबविण्याचा आदेश दिलेला असताना या नेत्यांचा ताफा कार्यालयाच्या आत आला होता. यात या मंडळींकडून पदाचा गैरवापर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.