राज्यभरात भाजपला पराभवाचा दणका; पोटनिवडणुकीत शिवसेनेसह विरोधीपक्षांचा विजय

टीम महाराष्ट्र देशा : स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत धडकी भरवणारे शक्ती प्रदर्शन करणाऱ्या भाजपला आज राज्यभरातील पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई, पुणे, नाशिक तसेच सोलापूर महापालिकेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेसह विरोधीपक्षांनी विजय संपादन केले आहे.

मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत सायनमधील प्रभाग क्रमांक १७३ चा गड राखण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे ६११६ मतांनी विजयी झाले. तर पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार सुकन्या गायकवाड यांचा प्रभाव केला.

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 14 मधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तौफीक हत्तुरे यांनी विजय मिळवत काँग्रेसचा गड राखला. तर नाशिकमध्ये मनसेचे इंजिन चालले असून मनसे उमेदवार वैशाली भोसले यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे.