उमेदवारी अर्जासोबत द्यावे लागणार जात पडताळणी प्रमाणपत्र

वेब टीम  : सोलापूर जिल्ह्यात १५ ग्रामपंचायत व पोटनिवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र निवडणूक आयोगाने प्रथमच उमेदवारी अर्जासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक केल्याने इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. यामुळे अनेकजण आयोगाचा हा आदेश रद्द होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

१० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, १२ रोजी छाननी करण्यात येणार आहेत. १५ फेब्रुवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. करमाळा तालुक्यातील रावगाव, कावळवाडी व केम, अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगाव व करजगी, माळशिरस तालुक्यातील देशमुखवाडी, कन्हेर, लवंग, कोंढारपट्टा व सवतगव्हाण, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व मोहोळ तालुक्यातील जामगाव खुर्द आणि मलिकपेठ/दाईंगेवाडी/खरकटणे या १३ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपत आहे.

विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ११७ ग्रामपंचयतींच्या १८३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. बार्शी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या ४६, उत्तर सोलापूर तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या ४, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या २१ तर अक्क्लकोट तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या ३१ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.