ज्या विद्यापीठाने आर्थिक बोजामुळे १२ अभ्यासक्रम बंद केले; ते संतपीठ कसे चालवणार?

ज्या विद्यापीठाने आर्थिक बोजामुळे १२ अभ्यासक्रम बंद केले; ते संतपीठ कसे चालवणार?

santpeeth

औरंगाबाद : संताची भूमी असलेल्या मराठवाड्यातील पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपवून गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या संतपीठात अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे आर्थिक परिस्थिती अतिशय खराब असल्याने विद्यापीठाने १२ अभ्यासक्रम नुकतेच बंद केले आहेत. असे असतांनाही विद्यापीठाला संतपीठाचा आर्थिक बोजा कसा परवडेल असा प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संतपीठासाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, शैक्षणिक व्यवस्थापनातील अनुभवी संस्था म्हणून पैठणच्या संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे सोपवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्वनिधीतून करावा लागेल, असे शासन आदेशात म्हटले आहे.

आर्थिक बोजा परवडत नाही म्हणून गेल्या काही वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वतःच्या परिसरातील तब्बल १२ शैक्षणिक विभाग बंद केले आहेत. ज्या विद्यापीठाला आर्थिक बोजा परवडत नाही म्हणून स्वतःच्याच परिसरातील तब्बल १२ विभाग बंद करावे लागतात. त्या विद्यापीठाला औरंगाबादपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण येथील संतपीठाचा आर्थिक बोजा कसा परवडेल? याचाही विचार होणे आवश्यक आहे. विद्यापीठाची एकूणच आर्थिक स्थिती पाहता विद्यापीठावर संतपीठातील अभ्यासक्रमांचा आर्थिक बोजा न टाकता संतपीठातील अभ्यासक्रम चालविण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा. म्हणजे संतपीठातील विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम नीटपणे चालवता येऊ शकतील.

महत्त्वाच्या बातम्या