साडेसात एकरचा भूखंड बळकाविण्याचा प्रकार ; दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

अभिजित कटके

पालघर , ०५ फेब्रुवारी, (हिं.स.) : सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ या प्रकरणातील दोन्ही दोषींवर कडक कारवाईची मागणी माकूणसार ग्रामस्थांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका ति-हाइत व्यक्ती मार्फत या जागेवर अचानक तारेचे कुंपण घालून तो बळकावण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता त्याने कुंपण घातले व हा भूखंड बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या लगत असलेल्या माकूणसार खाडीचे खारे पाणी शिरून ही जमीन नापीक व पडीक होती. मात्र, अचानक ती लागवडी खाली असल्याचा देखावा करून तेथे शेती करत असल्याचा बनाव जमीन लाटण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तिमार्फत रचण्यात आला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला असून ही जमीन पूर्वी पडीक होती आणि अचानक ती पिकपाण्याखाली आली कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकूनानी या पीकपाणीच्या नोंदी स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी केल्या असून त्यावेळचे तलाठी रत्नदीप दळवी यांनी तशा नोंदी व फेरफार केल्या असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा भूखंड हा खाडी पात्राच्या जवळ असल्यामुळे येथील खारे पाणी या भूखंडावर पसरत असल्यामुळे नजीकच्या शेतकऱ्याच्या जमिनीचे त्यापासून रक्षण होते. परंतु आता या भूखंडावर मोठे बांध बांधण्यात आल्याने खाडीचे खारे पाणी थेट शेतीमध्ये जाऊन जमिनी नापीक होण्याचा धोका वाढला आहे. तसेच सदर इसमाने माकूणसार पूर्वेकडून पश्चिमेकडे खाडीपात्रात जाणाऱ्या नैसिर्गक नाल्याच्या मार्गात मोठा बांध घालून या नैसिर्गक नाल्याचा मार्ग पूर्णत: बंद केला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी माकुणसार पालघर मुख्य रस्त्यावर साचून माकूणसार आणि लगतच्या २० गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. या भूखंडावरील सर्व बेकायदेशीर कामाविरोधात माकूणसार ग्रामस्थांनी या विरोधात ग्रामपंचायत सभेत ठरावही घेण्यात आला आहे. याप्रकरणी प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित भूखंडावरील सर्व अतिक्रमण दूर करण्याची आणि सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावर महसूल विभाग आणि प्रशासन यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येथील नैसिर्गक नाला बंद केल्याने शेतक-यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. या इसमाविरोधात व या बेकायदेशीर कामाविरोधात ग्रामस्थांनी मिळून ग्रामसभेत याविरोधी ठराव घेतलेला आहे, असे सरपंच जयंत पाटील म्हणाले. संजय दुबे नामक व्यक्तींनी पीकपाणी नोंद केली असल्याचे प्राथमिक स्तरावरून आढळून येत असून या प्रकरणाचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करणार आहे, असे मंडळ अधिकारी गौरंग बंगारा म्हणाले.