परभणीच्या दोघांनी ६ हजार १०० मीटर ऊंचीवर फडकवला शिवरायांचा भगवा ध्वज

parbhani

परभणी : भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच सामाजिक संदेश देत अवघ्या १० तासात परभणीच्या तरुणाने लेह- लदाख मधील कांग यात्से हे शिखर सर केले आहे. रणजित कारेगांवकर, विष्णू मेहेत्रे या दोघांसह दिल्ली, राजस्थान, हैद्राबाद आणि गुजरात येथील प्रत्येकी एका जणांचा यात समावेश आहे. कांग यात्से हे ६ हजार २५० मीटर उंच शिखर आहे.

राजस्थानचा २५ वर्षीय तरूण संदीप सैनी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या गिर्यारोहनात भारतातातील पाच राज्यातील या गिर्यारोहकांनी एकमेकांच्या साथीने हे कठीण हिमशिखर सर केले. यात राजस्थानच्या संदीप सैनी मानसिक स्वास्थ्य संघटनेचा संदेश घेऊन मोहीमेत सहभागी झाला होता. तर दिल्लीचे राहूल शर्मा (३१) कचरा करू नका आणि सुंदर सृष्टी बिघडवू नका; आंध्रप्रदेशचा हर्षादीत्य बिजापूरी (२५) शेतकरी वाचवा; गुजरातचे डाॅ. सत्यगांधी चिन्नम (२५) ‘स्वस्थ रहा आणि कोविड लस घ्या’; आणि महाराष्ट्रतील परभणीचे रणजित कारेगांवकर(४६), विष्णू मेहेत्रे(३९) हे पाणी वाचवू, वृक्ष लावू, वाढवू , निसर्ग व वन्यजीवसंर्वधन करू असे संदेश घेऊन गिर्यारोहनात सहभागी झाले होते. या गिर्यारोहकांनी राहूल शर्माच्या नेतृत्वाखाली स्वतःचा कचरा तर सोबत आणलाच पण शिखराच्या वाटेतला इतर हानीकारक प्लास्टीक कचराही गोळा केला.

लेहपासून साठ किमी अंतरावर असणाऱ्या चौकदा गावात चारचाकीने पोहचून तेथून १७ किमी पायी प्रवास करत कांगमारू हा १७ हजार ५०० फुट उंचीचा दुर्गम पर्वत ते चढले. निमालीन येथे मुक्काम करत निसर्गाचा आनंद घेत त्यांनी हा प्रवास पायी केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बेसकॅम्पवर पोहचून उने १० सेल्सीअस तापमानात  १ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता गिर्यारोहनास सुरूवात झाली. सर्वजण सकाळी साडेआठ वाजता ६ हजार मीटर पर्यंत उत्साहात चालत गेले. रात्रीच्या अंधारात इतके अंतर उत्साहात कसे चाललो हे कुणालाच कळले नाही. त्याठिकाणी उने १५ अंश तापमान होते. रात्रीत बर्फवृष्टीही झाली होती आणि पुढे अजून उंचीवर जाड हिमभेगा (दरडी) जाणवत होत्या वातावरणातही बदल होत होते. त्यामुळे सर्वांनी चढून जाणे योग्य नाही फक्त एकच जण जाणे योग्य राहील असे मोहीमप्रमुख संदीप सैनी यांनी सुचवले. त्यांनी याच ठिकाणी थांबून मोहीमेची सांगता करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्वांतर्फे संदीप सैनी यांनी एकट्याने शिखरापर्यंत जावून मोहीमेची सांगता करावी अशी सूचना कारेगांवकर व बिजापूरी यांनी केली.

डोळ्यासमोर शिखर दिसत असताना वातावरणापुढे नमुन इतरांनी ६ हजार १०० मीटर ऊंचीवरच शिवरायांचा भगवा फडकवत भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत एकमेकास अलिंगन दिले. दरम्यान त्यांच्या या यशाबद्दल पाणी वीज बचत गट, सह्याद्री ट्रेकर्स, स्वराज्य ट्रेकर्स,परभणी आणि सर्व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या