एका महिन्याच्या अंतरात दोघे भाऊ विधानपरिषदेवर !

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या राजकारणात बहुदा प्रथमच दोघे भाऊ एकाच सभागृहात जाण्याची वेळ साधून आली आहे. नाशिक मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आधी मोठे बंधू नरेंद्र दराडे आणि त्यानंतर जेमतेम महिन्याभरातच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लहान बंधू किशोर दराडे हे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोघे भाऊ शिवसेनेच्या तिकीटावरच निवडणूक लढवून जिंकले आहेत. एक महिन्याच्या अंतराने एकाच घरात दोन आमदार झाले असून, दोघेही भाऊ आता वरीष्ठ सभागृहात बसणार आहेत.

किशोर दराडे यांना 24 हजार 369 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत टीडीएफचे उमेदवार संदीप बेडसे यांना 13 हजार 830 मतांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपचे अनिकेत पाटील तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

तर विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे तब्बल ३९९ मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी कॉँग्रेस-भाजपा आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा १६७ मतांनी दणदणीत पराभव केला होता.

नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे दोघेही एकेकाळचे पैलवान असून कुस्तीचा आखाडा गाजवल्यानंतर आता हे दोघेही भाऊ विधानपरिषदेचा राजकीय आखाडाही गाजवण्यास तयार झाले आहेत. दराडे बंधू यांचे वरिष्ठ सभागृहात आगमन झाल्याने शिवसेनेची ताकद अजूनच वाढली आहे. याआधी दोघांनीही एकत्र नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात काम पहिले आहे.