‘दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित…’

मुंबई :  शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन करता येते. परंतु मागील वर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने भरविण्यात आला होता. यंदाच्या वर्षी हा मेळावा ऑफलाइन पद्धतीने होणार असला तरी जागा मात्र शिवतीर्थ नसून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या नियमामध्ये काही प्रमाणात राज्य सरकारकडून शिथिलता करण्यात आली. त्यानुसार राज्यातील शाळा, कॉलेज, मंदिरे, चित्रपटगृह आणि नाट्यगृह  ५० टक्के क्षमतेने खुली करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत लिहिले की, ‘इतकंच होतं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत? नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांचा मेळावा राजकीय अजेंड्यापेक्षा मोठा आहे हे यांना लक्षातच येत नाही का?’, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

तर पुढे सरकारच्या येत्या दसरा मेळाव्याबाबत टीका करत अमेय खोपकर म्हणाले, ‘षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? शिवसैनिक ५० टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही?’. असे अनेक प्रश्न त्यांनी सरकारच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासंदर्भात विचारले आहेत.

महत्वाच्या बातम्या