सीना नदीच्या पात्रात विजेचा मनोरा कोसळला; महावितरणची १० उपकेंद्रे अंधारात

tower

सोलापूर– शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सीना नदीच्या प्रवाहात महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही क्षमतेची वाहिनी असलेला मनोरा कोसळल्याने सोलापूर जिल्ह्यातील आणखी १० उपकेंद्रे अंधारात गेली. सुदैवाने अक्कलकोट ते करजगी मार्गे अर्धवट असलेल्या २० किमी लाईनचे काम महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत पूर्ण केल्यानंतर रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बंद झालेली महावितरणची ८ उपकेंद्रे पुन्हा कार्यान्वित झाली. असे असले तरी दीड हजारांहून अधिक विजेचे खांब कोसळल्याने ३० उपकेंद्रे व ८७०७ रोहित्रे अजूनही बंद आहेत. परिणामी लाखभर सोलापुरकरांचा वीजपुरवठा अद्यापही ठप्प असुन, तो सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

परतीच्या पावसाने संबंध सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. नदीकाठची वीज यंत्रणा पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अक्षरश: वाहून गेली आहे. जोपर्यंत पाणी कमी होत नाही, तोपर्यंत नुकसानीचा नेमका अंदाज येणे शक्य नाही. प्राप्त माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख ४४ हजार ९१५ ग्राहक या पावसाने बाधित झाले. त्यापैकी ४४ हजार १११ ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी दिवसभरात सुरु करण्यात आला. त्यासाठी काल दुपारपासून उच्चदाबाचे ४७ व लघुदाबाचे १२६ खांब उभारावे लागले. तरीही १ लाख ९ हजार ४९२ ग्राहक शिल्लक असून, पाणी ओसरताच त्यांचाही वीजपुरवठा सुरु केला जाणार आहे.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे हे सोलापूर जिल्ह्यात ठाण मांडून परिस्थिती हाताळत आहेत. तसेच सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांचेसह सर्व अभियंते, जनमित्र वीजपुरवठा कमीत कमी वेळेत सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बाधित ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन श्री. पावडे यांनी केले आहे.

बारामती : मंडलात बुधवारी व गुरुवारी झालेल्या तुफान पावसामुळे शिरसोडी, पाहुणेवाडी, सांगवी, आगोती, कामथडी, भट निमगाव, बाभुळगाव, सणसर, व कंदलगाव हे ९ वीज उपकेंद्रे बंद पडली होती. कंदलगाव वगळता सर्व आठ उपकेंद्रे गुरुवारी दिवसभरात सुरु करण्यात यश आले. तर शुक्रवारी सकाळी कंदलगाव सुरू झाल्याने बाधित झालेल्या ५६ वाहिन्या पूर्ववत सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत संपूर्ण मंडलात केवळ १८४ रोहित्र बाधित आहेत. ज्यावर १८२७ शेती व शेती वगळता ७२० असे २५४७ ग्राहक शिल्लक आहेत. त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच ते पूर्ण होईल.

सातारा : जिल्ह्यात तीन उपकेंद्रांचा वीजपुरवठा काल (दि.१५) विस्कळीत झालेला होता. परंतु, गुरुवारी दिवसभरात शिंगणापूर व बिजवडी उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु झाला व पाचवडचा रात्री उशिराने सुरु करण्यात यश आले. बाधित झालेल्या २१ हजार ८७४ ग्राहकांपैकी आता केवळ १४८६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असून त्यातील १०६७ हे शेतीपंप आहेत. एकमेव शिल्लक राहिलेली शेनवडी ११ केव्ही वाहिनी सुरु होताच बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-