मेल्ट्रॉन सेंटरमधील रेमडेसिवीर चोरी प्रकरणातील ‘ते’ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात

remdesivir

औरंगाबाद : महापालिकेतील गायब झालेल्या रेमडिसिवीर प्रकरणी मुख्य फार्मसिस्ट विष्णू रगडे व सहाय्यक फार्मसिस्ट प्रणाली कोल्हे यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जिन्सी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी (दि.३) पालिकेच्या भवानीनगर येथील आरोग्य विभागाच्या स्टोअररुमला भेट देत पाहणी केली. त्यांनी स्टोअर रुममधील स्टॉक रजिस्टर ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संपूर्ण देशात रेमडेसिविरवरुन राजकीय वातावरण तापले आहे. रेमडेसिविरची पळवापळवी, काळाबाजार, चोरी प्रकरण यांसारख्या गोष्टी सर्रासपणे घडत आहेत. औरंगाबादेतही मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर प्रकरणे घडत आहेत. महापालिकेच्या मेडीकल स्टोअर रुममधून ४८ रेमडेसिवीर इंजक्शन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार २८ एप्रिल रोजी उजेडात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक झाली आहे. तर पोलीस आता याचा अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत.

सद्यस्थितीत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आढळत आहे. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना रेमडेसिवीरच गरज भासत आहे. मात्र यातच मागणीपेक्षा रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कमी होत असल्याने सरकारने जिल्हास्तरावर इंजेक्शनच्या वाटपाचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. तर महापालिका स्तरावर पालिकेचे आयुक्त किंवा प्रशासकांना हे अधिकार आहेत. त्यामुळे पालिकेने दहा हजार इंजेक्शनची खरेदी केली होती. त्यातील चार हजार इंजेक्शन्स जिल्हाधिकारी व घाटी रुग्णालयाला देण्यात आले. बाकी इंजेक्शन पालिकेच्या ताब्यात भवानीनगर येथील स्टोअररुममध्ये ठेवले.

२६ पैकी एका बॉक्समध्ये ४८ रेमडिसिवीर इंजेक्शनऐवजी ७५ एमपीएस इंजेक्शन असल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्राथमिक चौकशी अंती आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी स्टोअररुममध्ये कार्यरत असलेल्या पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्याा. या नोटीसचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी झाली. छाननीच्या नंतर मुख्य फार्मसिस्ट विष्णू रगडे व सहाय्यक फार्मसिस्ट प्रणाली कोल्हे यांच्या विरोधात शनिवारी रात्री पोलिसात पालिकेच्यावतीने स्टोअर विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे जिन्सी पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या