हिंदू जननायक ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात मनसेने आपला झेंडा बदलला. त्यात मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ हिंदू जननायक ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा, असं सांगतानाच, मला हिंदू जननायक म्हणू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं. तसेच त्यांनी यावेळी औरंगाबादच्या नामकरण विषयावर देखील भाष्य केल. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झाल्यास काय हरकत आहे. चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत. असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीकाही केली.

ते पुढे म्हणाले, ‘ मी कधीच माझी भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकार, बांगलादेशींना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. तर मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी देखील आम्हीच गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.

आम्ही फक्त झेंडा बदलला आहे. आमची भूमिका तीच कायम आहे. राजकारणात झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी आम्ही काही केलेले नाही, असे स्पष्ट करत धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते औरंगाबाद येथे बोलत होते. पक्षाचे धोरण आणि झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.