शिवाजी महाराजांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ

महाराष्ट्र ट्रेड फेअरमध्ये उधळली मुक्ताफळे

औरंगाबाद : शिवाजी महाराजांच्या वंशजांवर एकदा हिरा विकण्याची वेळ आली होती. मुंबईच्या बाजारपेठेत  हिऱ्याचा  लिलाव सुरू होता. हा लिलाव थांबवून भोसले कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत माहेश्वरी समाजाच्या एका व्यापाºयाने केली होती, अशी मुक्ताफळे शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी औरंगाबादेत उधळली. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
महाराष्ट्र प्रदेश व औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे कलाग्राम येथे ‘महाराष्ट्र ट्रेड फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित राहू शकले नाहीत. प्रदर्शनाचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाठ यांची उपस्थिती होती.यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी नमूद केले की, माहेश्वरी समाजाच्या रक्तातच व्यवसाय आहे. पूर्वी या समाजाच्या हाती तलवार होती. आता तराजू आला आहे. कोणत्याही मातीत गेल्यावर तेथील समाजाशी एकरूप होवून तो व्यवसाय करतो. याचे उदाहरण देत जाजू पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या वंशजावंर एकदा अनमोल हिरा विकण्याची वेळ आली. भोसले असे त्यांच्या वंशजाचे नाव होते. ते हिरा विकण्यासाठी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाले. हिरा विकण्यासाठी भोसले स्वत: पुढे न जाता त्यांनी दुसऱ्याला पुढे केले.

हिरा पाहुण व्यापारी अचंबीत झाले. ज्याने हिरा विक्रीसाठी पुढे केला त्याला विचारले की, तुझ्यासोबत कोण आहे. त्यानंतर भोसले यांनी आपली ओळख दिली. काही वेळेनंतर हिऱ्याचा लिलाव सुरू झाला. ६२ लाख रुपयांची बोली लागली. याचवेळी एका माहेश्वरी समाजाच्या व्यापाऱ्याने लिलावातून भोसले यांना बाजूला घेवून तूम्हाला किती पैसे पाहिजे असे विचारले. भोसले यांनी ५० लाख असे सांगितले. माहेश्वरी समाजाच्या व्यापाऱ्याने एका क्षणार्धात ५० लाख रुपये त्यांना दिले.

विशेष बाब म्हणजे भोसले यांच्याकडून चेक किंवा कोणत्याही कागदपत्रावर लिहून घेतले नाही. त्यानंतर भोसले यांनी लिलाव रद्द केला, असेही जाजू यांनी मुक्ताफळे उधळली. त्यांचे हे विधान एकूण उपस्थित सभागृहात काहींनी टाळ्यांचा कडकडाट केला.

You might also like
Comments
Loading...