वाघाला गोंजारणं सोपं नाही, वाघाचा पंजा भयाणक असतो- संजय राऊत

नवी दिल्ली: कधीकाळी मित्र असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये कमालीची कडवटता आली आहे. त्यात शिवसेनेने एकला चलोचा नारा दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अस्वस्थ झालेल्या भाजपाने आपल्या या जुन्या मित्राला खूश करण्यासाठी राज्यसभेतील मोठं पद देण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अशी ऑफर अधिकृतपणे आलेली नाही, त्याची माहिती ही फक्त माध्यमांमधूनच कळाली असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. वाघला गोंजारणं सोपं नाही, वाघाचा पंजा भयाणक असतो असंही ते म्हणाले.

राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपतोय. हे रिक्त होणारं मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपाश्रेष्ठी तयार असून त्यांनी तसा पर्याय शिवसेना नेतृत्वापुढे ठेवला आहे. तो स्वीकारायचा किंवा नाही, याचा निर्णय अर्थातच उद्धव ठाकरे घेतील. राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. त्यात संजय राऊत सर्वात ज्येष्ठ, अनुभवी आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना राज्यसभेच्या उपसभापती पदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेनेच्या खासदारांनी काल संसदेत चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली होती, त्यावरही संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला स्पष्टीकरण दिले. अशा भेटीगाठी होत असतात. चंद्राबाबूंनी जो मार्ग निवडला आहे, तो मार्ग आम्हीच आखून दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत, उदयाचं माहित नाही असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.