उंबरठे झिजविले पण कर्जमाफीचा लाभ मिळेना, शेतकरी महिलेची व्यथा

लातूर : राज्य सरकारने मागील वर्षी कर्जमाफी देऊन ही त्याचा लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.औसा तालुक्यातील भादा गावातील ही घटना कर्जमाफीसाठी पात्र असूनही शासनाने जाहीर केलेल्या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या एका शेतकरी महिलेचा प्रशासनाने अक्षरश: फुटबॉल केला असून ही महिला शेतकरी आपला हक्क मिळवण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे.

भादा येथील दैवशाला पिता चंद्रसेन गायकवाड उर्फ दैवशाला पती राजेंद्र गाडेकर या महिलेच्या नावे तीन एकर जमीन असून तिने २०१४-१५ यावर्षी औसा येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेतून एक लाख पीककर्ज घेतलेले होते. दरम्यान याकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली होती.

परंतु या दोन्ही कर्जमाफी योजनेचा लाभ या शेतकरी महिलेला मिळाला नसल्यामुळे तिने संबंधित बॅंकेसह जिल्हा, तालुका निबंधक कार्यालयात वेळोवेळी लेखी तक्रार करून कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी केली. परंतु या मागणीची दखल न घेता विविध तकलादू कारण पुढे करून प्रशासकीय यंत्रणेने तिची दखल घेतली नाही, हे विशेष.

महत्वाच्या बातम्या