भारत-इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात

india

अहमदाबाद : चेन्नईमध्ये इंग्रजांना पाणी पाजल्यानंतर विराट सेना आता अहमदाबाद मधील नव्या कोऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये इंग्रजांना धूळ चरण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून (२४ फेब्रुवारी)  अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

चार सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने नव्या स्टेडियममधील मोटेराच्या नव्या खेळपट्टीवर होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. गुलाबी चेंडूवर होणाऱया या सामन्यासाठी यजमान भारतीय व पाहुणा इंग्लंड संघ सज्ज झालाय. गतसामन्यात विराट कोहलीच्या सेनेने जो रूटच्या ब्रिगेडला चारीमुंडय़ा चीत केले असले तरी बुधवार, 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर वर्चस्व गाजविण्यासाठी ‘टीम इंडिया’ला गुलाबी चेंडू योग्य पद्धतीने हताळावा लागणार आहे.

याप्रसंगी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट पणाला लागले आहे. भारताच्या संघाला तिसऱ्या किंवा चौथ्या कसोटीत पराभवाचा चेहरा पाहावा लागल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलला मुकावे लागणार आहे. त्यामुळे उद्यापासून दोन कसोटींचे दहा दिवस टीम इंडियाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

दिवस-रात्र कसोटी सामना अर्थातच दुपारी अडीच वाजता सुरू होईल. त्यामुळे अखेरच्या सत्रात रात्री काय नाटय़ घडते यावर या कसोटीचे चित्र अवलंबून असणार आहे. कारण सायंकाळनंतर मैदानावर दव पडायला सुरुवात होते. यावेळी मध्यमगती गोलंदाजांना चेंडूवर पकड ठेवणे नक्कीच थोडे अवघड जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या