सांगली पोलिस मुख्यालयाच्या आवारातून चंदनाच्या झाडाची चोरी

SANDALWOOD_TREE

सांगली : सांगली जिल्हा पोलिस दलाकडील तीन प्रमुख वरिष्ठ पोलिस अधिका-यांचे निवासस्थान असलेल्या पोलिस मुख्यालय परिसरातील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेले. चोरीच्या या घटनेमुळे सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे. विश्रामबाग येथील सांगली जिल्हा पोलिस मुख्यालय परिसरात पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे व पोलिस उपअधिक्षक (गृह) बाजीराव पाटील यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सांस्कृतिक सभागृहानजीकच चोरीचा हा प्रकार घडल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलिस मुख्यालयाच्या पश्‍चिमेकडील बाजूला व अत्यंत वर्दळीच्या रस्त्याकडेला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली. या परिसरात बंदोबस्तास असणा-या पोलिस शिपाई शरद मेंगाळ यांना पहाटेच्या सुमारास प्रवेशद्वारानजीक काही संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यांनी तात्काळ धाव घेऊन अन्य सहकार्‍यांना मदतीसाठी हाक दिली असता पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी पळ काढला. या चोरट्यांनी दहा हजार रूपये किंमतीचे तीन चंदनाच्या झाडांचे बुंधे (ओंडके) करवतीने कापून नेले. या घटनेची वरिष्ठ अधिका-यांसह पोलिस मुख्यालयाला तात्काळ माहिती देण्यात आली. विश्रामबाग पोलिसांनी या चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे मिळून आले नाहीत. याबाबत शरद मेंगाळ यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती संगिता माने-पाटील करीत आहेत.