मुंबई : चित्रपट, वेब सिरीज, मालिका यामध्ये महत्वाचा रोल(भूमिका) देण्याचे आमीष दाखवून तरुण मुलींना शारीरिक संबंधाची मागणी केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये असे गैरप्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या प्रकाराला कास्टिंग काऊच असं देखील म्हटलं जातं.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने असा गैरप्रकार करणाऱ्या परप्रांतीयांना चांगलीच अद्दल घडवली आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या दिग्दर्शक आणि निर्मात्याला चांगलाच चोप दिला होता. यातील यादव नामक व्यक्ती हा शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगत आमदार-खासदारांशी ओळख असल्याची भीती घालत असल्याचे देखील समोर आले आहे.
या घटनेनंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे आणि मनचिसेकडे तक्रार करणाऱ्या नवोदित अभिनेत्रीने माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी त्या अभिनेत्रीने कास्टिंग काऊच बाबत आलेला थरारक अनुभव सांगितला असता असे प्रकार किती गंभीर आहेत याची आपल्याला जाणीव होते.
’29 जुलै रोजी राहुल तिवारीचा मला फोन आला. एका हिंदी चित्रपटात रोल देत असल्याचं तो म्हणाला. मात्र प्रोड्युसरला खुश करावं लागेल, असं तो म्हणताच मी नकार दिला. पण पुन्हा वारंवार फोन येत होते. मी कुटुंबासोबत चर्चा केली आणि मुद्दाम होकार देत धडा शिकवायचा निर्णय घेतला,’ असं म्हणत त्या अभिनेत्रीने धाडसी निर्णय सर्वांसमोर सांगितला.
पुढे ती म्हणाली, ‘“दुसऱ्या दिवशी मला फाऊंटन हॉटेलला बोलावण्यात आलं. हॉटेलला एकटी ये, रात्रभर थांबावं लागेल, तुझी लाईफ बनवतो, असं तो म्हणाला. आम्ही रिक्षाने तिकडे गेलो. मला त्या लोकांनी त्याच्या रिक्षाने पुढे नेलं. नंतर त्याच्या गाडीत बसवलं. त्याच्या हातात बंदूक होती. मला चार तास फिरवत होते. मी लाईव्ह लोकेशन शेअर केलं होतं. पुढे त्यांनी मला कोणती दारु घेणार, असंही विचारलं. पुढे आनंद नगरला घेऊन गेले. तिथून अलका फार्म हाऊसला नेलं. तिथे मनसेची टीम पोहोचली आणि त्यांनी मला वाचवलं.
इतकंच नाही तर पोलिसांकडून सेटलमेंट करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप देखील या अभिनेत्रीने केला आहे. ‘सर्व नवोदित अभिनेत्रींनी अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे. पोलीस स्टेशनला गेले, तर पोलिसांनी उलट प्रश्न विचारले. सेटलमेंट करणार का, असं विचारत होते, पोलिसांनी काही मदत केली नाही,’ असं ती म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
- ‘झिका’ मुळे चिंतेत भर तर राज्यात आज ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- ‘महापुरावर कायमस्वरुपी तोडगा काढणारच, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हे माझं वचन’
- विरोधक सभागृहात येऊन चर्चेत सहभागी होण्याऐवजी ते चर्चेपासून दूर पळत आहेत – भाजप