मराठा आरक्षणासंदर्भात ‘ठाकरे सरकार’ला अजिबात गांभीर्य नाही : गिरीश महाजन

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी अजिबात गांभीर्य नाही, असा घणाघाती आरोप माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांनी आज जळगावात माध्यमांसोबत बोलतांना ठाकरे सरकारवर केला.

जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडून गेल्यावर जळगाव जिल्हा भाजपाच्या कोअर कमिटीच्या वतीने आज दुपारी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

त्यांना मराठा आरक्षण प्रश्नी पत्रकारांनी छेडल्यावर महाजन म्हणाले, की या विषयासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विध्यमान सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या बैठका सुरू आहेत, विचारविनिमयदेखील केला जात आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या ठोस निर्णयापर्यंत सरकार पोहोचत नाहीये. त्यामुळे या विषयात दिरंगाई होत आहे. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नसल्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे काही नोकरभरतीदेखील रखडल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही विशेष समिती स्थापन केली होती.

पाच सदस्यांच्या समितीने अभ्यासपूर्ण नियोजन केलेले होते. एकही मुद्दा आमच्या नजरेतून सुटलेला नव्हता. मात्र, पुढे दुर्दैवाने आमचे सरकार गेले. उच्च न्यायालयात आम्ही आरक्षण टिकवले. पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्याठिकाणी आरक्षणाला स्थगिती मिळाली. सरकारला गांभीर्य नाही, त्यांचे नेते आणि मंत्र्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर दुमत आहे. अतिशय नियमांमध्ये बसून आरक्षण दिलेले होते. पण तीन पायाच्या शर्यतीसारख्या चालणाऱ्या सरकारच्या दिरंगाईमुळे या विषयाचा खेळखंडोबा झाला आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

जळगावात भाजप कोअर कमिटीच्या वतीने तातडीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या 

IMP