नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जात पडताळणी दाखला अवैध ठरल्याने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द केले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. गायकवाड यांचे पद रद्द करु नये यासाठी आयुक्तांवर सत्ताधा-यांचा तर पद रद्द करावे यासाठी विरोधकांचा मोठा दबाव होता.  तसेच भाजपच्या आणखी तीन नगरसेवकांवर देखील कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने  दिला आहे. एवढेच नव्हे तर गायकवाड यांनी खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन सरकारची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.

गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास पालिका आयुक्त हर्डीकर टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गायकवाड यांचे पद रद्द करु नये यासाठी सत्ताधारी पक्षाचा आयुक्तांवर मोठा दबाव होता. त्यासाठी एक आमदारांनी आयुक्तांची गुरुवारी भेट देखील घेतली होती. तर, विरोधकांकडून गायकवाड यांचे पद रद्द करण्याची मागणी आयुक्तांककडे केली होती. दोन्ही बाजूंनी आयुक्तांवर मोठा दबाव होता. दबावाखातर आयुक्तांनी नाखुशीने  गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. गायकवाड यांना पालिकेने दिलेल्या सर्व सुविधा काढून घेण्यात येणार आहेत. त्यांना देण्यात आलेले मानधनही त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. नगरसचिव विभागाला तशा सूचना देण्यात येणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.