Weather Update | राज्यात पुन्हा तापमानात घट होणार, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये (Maharashtra) दिवसेंदिवस वातावरणात (Weather) बदल होत चालला आहे. राज्यात काही भागांमध्ये थंडीने आधीच कहर केलेला असताना, आता पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांमध्ये राज्यातील विविध भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर, पुणे, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगलाच गारठा वाढला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कडाक्याची थंडी पडत चालली आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये थंडीचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये किमान तापमान पाच अंश सेल्सिअस पर्यंत येऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात मुंबईत देखील तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 13 ते 14 जानेवारी दरम्यान मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. परभणीतील तापमान अत्यंत घसरले आहे. काल जिल्ह्यामध्ये 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर आज देखील जिल्ह्याचे तापमान 6.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरी भागातही जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. तर, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये देखील घसरण झाली आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये देखील तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचला आहे. दिवसभर वातावरण थंड असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या थंडीचा परिणाम जनसामान्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांच्या वेळा देखील बदलण्यात आल्या आहे. सकाळी सात वाजता सुरू होणारी शाळा आता पाऊण तास उशिरा भरवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या