शिक्षकांना पुन्हा अतिरिक्त ठरण्यासाठी भीती कायम

teacher-1

पुणे : सरल पोर्टलवरील विद्यार्थी संखेच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून विद्यार्थांची सरल वर माहिती भरण्यासाठी शिक्षकांची एकच धावपड उडाली आहे. संचमान्यतेसाठी फक्त १ जानेवारी रोजी असलेली विद्यार्थीसंख्या गृहीत धरण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली आहे.

सरल पोर्टलवर विद्यार्थांच्या माहितीची नोंद करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे मात्र लाखो विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांकच नसल्यामुळे शिक्षकांवर टांगती तलवार कायम आहे. तसेच संचमान्यता न झाल्यास फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात येणार नाही, अशी तंबीही शिक्षकांना देण्यात येत आहे.

सरल वरील तपशील गृहीत धरून विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वी ३० सप्टेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ती वाढवून २३ ऑक्टोबपर्यंत करण्यात आली होती. मात्र सतत येणाऱ्या तांत्रिक अडचणी व विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसल्यामुळे विद्यार्थांची माहिती भरता आली नाही. शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केला आहे. तसेच आता पुन्हा एकदा शिक्षकांची ऑनलाइन कामांशी झटापट सुरू झाली आहे. तसेच आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थांचे आधार आणायचे कुठून? असा प्रश शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे.