कोरेगाव प्रकरणी सर्वंकष चौकशीअंती दोषींवर निश्चित कारवाई होणार – मुख्यमंत्री

ramdas aathavle meets cm devendra fadanvis on koregao bhima riots

मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणाची सर्वंकष चौकशी होणार आहे. त्यातील दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वस्त केले. या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी भीमा-कोरेगाव, वढू बुद्रूक परीसरातील घटनाक्रमाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विविध मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. परिस्थिती बिघडविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. नूकसानग्रस्तांना भरपाई मिळावी. बंदच्या काळात निरपराधांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा निर्धार आहे. त्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल, नाहक नुकसान झालेल्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न राहील. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार आढावा घेतला जात आहे. बंदच्या काळात परिस्थिती बिघडविणाऱ्यांवर कारवाई होईलच. पण नाहक कुणावरही कारवाई होऊ नये, अशी काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.