fbpx

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याने आयुक्तांना समन्स

pf

सोलापूर : यंत्रमाग कामगारांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कायदा लागू आहे, हे ठणकावून सांगणारे विभागीय आयुक्त डॉ. हेमंंत तिरपुडे यांचा मोर्चा महापालिकेकडे वळला. रोजंदारी, मानधन आणि कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांचा ‘पीएफ’ भरलाच नाही.

याबाबत चौकशीसाठी खुद्द आयुक्त अविनाश ढाकणे यांनाच हजर राहण्याचे समन्स बजावले. या विषयावर २०१३ पासून चौकशी सुरू करण्यात आली. आदेश देऊनही २०१७ पर्यंत निधीची रक्कम जमा केली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना समन्स बजावले होते. परिणामी पालिकेने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम (आठ लाख चार हजार सहाशे अठ्ठावन्न) जमा केली. परंतु स्वत:चा हिस्सा दिला नाही. त्याची मुदत संपल्याने आयुक्तांनी स्वत: २९ ऑगस्टला उपस्थित राहावे, असे नोटिसीत म्हटले आहे.

…तर बँकांतील खाते सील : सोलापूर विभागात लातूर, उस्मानाबाद महापालिका आणि १९ नगरपरिषदा येतात. त्या भविष्य निधीबाबत अद्याप गंभीर नाहीत. संबंधित आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येतील. पालिका आणि नगरपरिषदांच्या बँक खाती सील करण्यात येतील. वेळ पडल्यास जप्तीची कारवाईही होऊ शकेल. शासकीय संस्था असो, की खासगी संस्था. भविष्य निधी कायद्याचे सर्वांनी पालन करावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा डॉ. तिरपुडे यांनी दिला.