दोन प्रभागांसाठीची पोट निवडणूक प्रक्रिया

pmc

पुणे : महापालिका निवडणूकीनंतर रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 21 (अ) आणि प्रभात क्रमांक 39 (अ) च्या पोटनिवडणूकीची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या निवडणूकीसाठीची प्रारूप मतदार यादी 18 ऑगस्ट पर्यंत अंतिम केली जाणार असून त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या यादीवर हरकती आणि सूचना मागवून ही यादी अंतिम केली जाणार आहे. दरम्यान, या प्रभागांच्या निवडणूकांच्या तारखा अद्याप निवडणूक आयोगाकडून निश्‍चित करण्यात आलेल्या नसल्या तरी, ऑक्‍टोबर 2017 मध्ये या दोन्ही प्रभागांमध्ये पोट निवडणूका होण्याची शक्‍यता महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीत प्रभाग 21(अ) मधून रिपाई-भाजपचे उमेदवार दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे निवडून आले होते.मात्र, त्याचे अकस्मित निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. तर प्रभाग 39 (अ) मधून राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर धनकावडे निवडून आले होते.मात्र, त्याचे इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरविले असून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. पालिका प्रशासनाकडून या बाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगास कळविली होती. त्यानुसार, आयोगाकडून ही प्रक्रीया सुरू करण्याचे आदेश पालिकेस मिळालेले असून त्यानुसार, प्रशासनाने प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या याद्या 18 ऑगस्ट रोजी पूर्ण करून निवडणूक विभागास सादर केल्या जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.