पोटात येऊ लागला पुन्हा भितीचा गोळा; ‘या’ जिल्ह्यात कोरोना पुन्हा वाढतोय!

corona

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत गेली. मात्र ऑक्टोबर सुरू झाला अन रुग्णांची संख्या घटू लागल्याने चार महिने कोरोनाच्या भितीने घरात बसलेल्यांच्या अंगीही धाडस संचारू लागले.

वेळोवेळी सूचना देऊनही अनेकांकडून त्याचे पालन झाले नाही. आता याचा पुन्हा परिणाम जाणवू लागला असून, रुग्णांची वाढती संख्या अनेकांच्या पोटात भितीचा गोळा निर्माण करत आहे. लाखो रूपये खर्च करूनही अनेकांना जीव गमवावा लागला तर यावरील उपचारासाठी अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले.

ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि नगरमधील कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली. प्रशासन वारंवार कोरोनाच्या धोक्याची जाणीव करून देत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फिजीकल डिस्टन्स, मास्क, सॅनेटाईज या शब्दांचा विसर पडत चालला आहे.

गेल्या दोन दिवसात वाढणारी रुग्ण संख्या चिंतेत भर टाकत आहे. आठ महिन्यात जे काही घडले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही सर्वांचीच इच्छा आणि प्रार्थना आहे. मात्र त्यासाठी आवश्यक काळजी घेण्याकडे सामूहिक दुर्लक्ष होत आहे.

सुरुवातीला मार्च, एप्रिल, मे या महिन्यात कोरोना आपल्याला होऊ नये म्हणून लोकांकडून काळजी घेण्यात येत होती, तशीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाहेर पडलेल्यांपैकी अनेकांनी ही काळजी घेतलेली नाही. दिवाळी साजरी करत असताना निष्काळजीपणामुळे एक प्रकारे स्वत:चे आणि संपर्कातील लोकांचे दिवाळ आपण काढत आहोत, याचे भान राहिले नाही.

त्याचे परिणाम रुग्ण संख्येत वाढीच्या रुपाने दिसत आहेत. भविष्यात कोणाचेही व्यवसाय बंद पडू नयेत, शाळा, महाविद्यालये सुरळीत चालू राहावेत, नोकर्‍या टिकाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसं जिवंत रहावीत, यासाठी प्रत्येकानेच ही काळजी घेण्याची गरज आहे. अजूनही वेळ गेली नाही, असे म्हणण्यापेक्षा आता पुन्हा ती वेळ येऊ नये, असे म्हणण्याची खरी गरज आहे.

महत्वाच्या बातम्या