बाबा पेट्रोल पंप चौकात वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली चोरीची कार

औरंगाबाद : सिग्नल तोडून वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालून पळण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पकडताच कार चोर तिघांनी धुम ठोकली. या कारमधून पोलिसांनी कटर, टॉमी आणि शस्त्र जप्त करण्यात आले. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकात घडली. यात वाहतूक पोलिसाचा पायाला किरकोळ जखम झाली. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रांतीचौकातून बाबा पेट्रोल पंपाकडे आज दुपारी येणा-या कार (एमएच-०९-एबी-७८८९) चालकाने सिग्नल तोडले. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे सहायक फौजदार दिलीप जाधव यांनी कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चालकाने त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी जाधव यांच्या उजव्या पायावरुन कारचे चाक गेले. किरकोळ जखम झाल्यामुळे जाधव यांनी कार चालकाला पाठलाग करुन थांबवले. कार चालक थांबल्यानंतर त्याला इतक्या घाईने जाण्याचे कारण विचारण्यात आले. तेव्हा त्याने अंत्यविधीसाठी जात असल्याचे सांगितले.

मात्र, जाधव चौकशी करत असतानाच कारमध्ये पाठीमागे बसलेल्या दोघांनी पळ काढला. त्यामुळे जाधव यांना कार चालकावर संशय आला. म्हणून जाधव यांनी कारची चावी काढून घेत त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. पण याचवेळी संधी साधून कार चालकाने पंचवटी चौकाच्या दिशेने धुम ठोकली. त्यानंतर कार बाजूला घेत जाधव यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, उपनिरीक्षक राहुल भदरगे यांच्याशी संपर्क साधला. याशिवाय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व इतर कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. कारची तपासणी करताना त्यामध्ये मोठे कटर, टॉमी, शस्त्र व इतर साहित्य आढळून आले.

कार चोरीची
पोलिसांनी कारच्या क्रमांकावरुन मुळ मालकाचा शोध घ्यायला सुरूवात केली. तेव्हा तिच्या क्रमांकावरुन ही कार कोल्हापूर येथील शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे समोर आले. ही कार शिवलिला हजारी यांच्या मालकीची असून, ती ३ मार्च रोजी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

महत्वाच्या बातम्या