राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला; 26 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

vidhanbhavan-

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 28 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येणार आहे, असा निर्णय आज झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी यावेळी कामकाजासंबंधी माहिती दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूण 35 दिवसाचे असणार असून 22 दिवस कामकाज चालणार आहे. 26 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यपाल महोदयांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल तर राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च 2018 रोजी दुपारी 2 वाजता सादर करण्यात येईल. या अधिवेशनात विधानसभेत 1 विधेयक प्रलंबित तर विधानपरिषदेत 4 विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय 4 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत तर त्याचबरोबर 4 प्रस्तावित अध्यादेश आणि 6 प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येणार आहेत.