महाराष्ट्र राज्य आणि मुंबई शहर हे संपुर्णपणे सुरक्षित; महाराष्ट्र ATSचा दावा

ats

मुंबई : आगामी नवरात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली आहे. दरम्यान या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असल्याचे पहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं आहे. त्याचं पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती.’ असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य आणि मुंबई शहर हे संपुर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, राज्य आणि मुंबई शहर हे संपुर्णपणे सुरक्षित आहे. तसेच कोणत्याही दहशतवादी कारवाईवर महाराष्ट्र एटीएसचे नियंत्रण असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आमच्या रडावर अनेक लोक हे दहशतवादी कारवायांच्या निमित्ताने असतात. पण या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई ही स्वतंत्र होती. त्यावेळी महाराष्ट्र एटीएसला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दिल्लीमध्ये महाराष्ट्र एटीएसची एक टीम जाणार असून जान मोहम्मदची चौकशी करेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या