राज्य सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल; भातखळकरांचा खोचक टोला

मुंबई : मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये हीच स्थिती असल्याने पुन्हा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

तब्बल १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन दिवसातच या दाव्यावर पाणी फेरले आहे. तर, भाजप नेत्यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, राज्याच्या इतर समस्यांसारखं राज्य सरकार पावसाची जबाबदारी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच ढकलेल, असा खोचक टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. ‘महापालिकेने मुंबई तुंबून दाखवली आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही आधीपासून सांगत होतो, ते आज उघड झालं आहे, अशी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, ‘राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील. मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असं त्यांनी म्हणू नये एवढीच अपेक्षा आहे.’

महत्वाच्या बातम्या

IMP