खा.दानवेंची नाराजी, राज्य सरकारने ‘या’ बाबतीत दिरंगाई करू नये

raosaheb danawe

जालना – राज्याच्या वाढीव मका व ज्वारी या धान्य खरेदीच्या प्रस्तावावर तत्परता दाखवत केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली. केवळ एका आठवड्याच्या आत मोदी सरकारने ही मंजुरी देऊन तत्परतेने पावले उचलली, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.

वाढीव मका व ज्वारी खरेदीची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र त्याचे वितरण कसे करणार याबाबत काही कळवले नव्हते. त्याची माहिती द्या तातडीने परवानगी देतो, अशी तयारी केंद्र सरकारने दाखवली होती. तरीही वितरणाचे नियोजन राज्य सरकारांकडून कळवण्यात येत नव्हते. गेल्या वर्षीही ४ स्मरणपत्रे केंद्राने राज्य सरकारला पाठवली होती. राज्य सरकारच्या दिरंगाईनंतर ४ जानेवारी २०२१ रोजी राज्य सरकारकडून नियोजनाचे पत्र पाठवण्यात आले व केंद्र सरकारने त्वरित यास परवानगी दिली.

राज्याने मक्याचे एकूण किती उत्पादन होणार आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. त्यानंतर वार्षिक उत्पादनाचा एक अंदाज केंद्र सरकारकडे तातडीने पाठवायला हवा. त्याच्या खरेदीची परवानगी टप्प्याटप्प्याने द्यावी, असे राज्याने स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. कारण राज्याला एकूण किती मका खरेदी करण्याची गरज आहे, हे त्याशिवाय केंद्राला समजू शकत नाही. त्यामुळे वाढीव मक्यासाठीची परवानगी घेताना त्यात वेळ जातो आणि त्याचा तोटा मका उत्पादक शेतकऱ्यांना होतो.

जर महाराष्ट्र सरकारने वितरण आराखडा यापूर्वी पाठवला असता तर परवानगी यापूर्वी देण्यात आली असती. त्यामुळे यापुढील काळात महाराष्ट्र राज्य सरकारने अशा प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या