राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी- अनिल बोंडे

anil bonde

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- परतीच्या पावसाचा अहमदनगर जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला असून नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी आज अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला.

अनिल बोंडे यांनी जिल्ह्यातील गोदेगाव येथे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांचे पिक पूर्णतः वाया गेले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत देण्याची गरज आहे. त्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे मत माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केले आहे.

मागील आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. नगर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, नेवासे, शेवगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके सडू लागली आहेत.

नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. नुकसान झालेल्या भागात अजूनही कृषी विभागाचे अधिकारी फिरकले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढले पाहिजेल, असे बोंडे म्हणाले.

तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे, असे बोंडे म्हणाले. यावेळी नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, अंकुश काळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-