राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि ‘एसएफआय’चा दणदणीत विजय

औरंगाबाद : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) युतीचे उमेदवार सचिन अंबादास हेमके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरवारी विद्यार्थी परिषद सचिवपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे. एसएफआय संघटनेला मागील चार वर्षांपासून पदरी येत असलेली निराशा यावेळी संपुष्टात आली आहे.

निवडणुकीत एकूण ५१ मतांपैकी ५० मतदारांनी हक्क बजावला. व्यवस्थापनशास्त्र विभागाचा प्रतिनिधी सचिन हेमके याने तब्बल २४ मते मिळवत पहिल्याच फेरीत विजय मिळवला. युवासेनेच्या पूनम पाटीलला १२, ‘अभाविप’च्या विवेक पवार ८ आणि सम्यकचा उमेदवार नारायण खरात यास ५ मते मिळाली.एसएफआयने शेवटच्या टप्प्यात प्रतिष्ठा पणाला लावत एकतर्फी विजय मिळविला.

सचिन हेमके यास प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एसएफआयच्या विजयानंतर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रशासकीय इमारत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत जोरदार मिरवणूक काढली.