द्वारपोच धान्य योजनेमुळे दुकानदारांना एक ग्राम देखील धान्य कमी मिळणार नाही

गिरीश बापट

मुंबई, दि. ७: राज्यातील 52 हजार स्वस्त धान्य दुकानांमध्ये पीओएस मशिन बसविण्यात आल्यामुळे या दुकानांमधील धान्याचा साठा, त्याची विक्री याबाबत माहिती मिळते. यामुळे राज्य शासनाचे दरवर्षी 42 कोटी रुपयांची बचत होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी आज विधान सभेत प्रश्नोत्तराचा तासात सांगितले.

यासंदर्भात सदस्य अतुल सावे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले, राज्यात धान्य द्वारपोच योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत दुकानदाराला दुकानातच धान्य मोजून दिले जाते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना 1 ग्रॅम धान्य देखील कमी मिळणार नाही. गरिबांना आणि गरजूंना धान्य मिळावे यासाठी आधारक्रमांकाच्या जोडणीचे काम सुरू आहे. धान्य वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नारायण कुचे, डॉ.जयप्रकाश मुंदडा, प्रकाश सुर्वे यांनी भाग घेतला.