सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा

सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा

rajesh tope

मुंबई : काही दिवसांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ऐनवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि यामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रचंड असंतोषाला आणि विरोधकांच्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच या परीक्षा रद्द करण्यात आल्याची सारवासारव राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली होती आणि आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही या परीक्षांबाबतचा घोळ सुटता सुटत नाहीये. आता गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.

अनेक पदवीधर आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच उमेदवाराने टीईटी परीक्षेसाठीही अर्ज केला आहे. आता त्यांच्यासमोर मोठी अडचण झालेली आहे की कोणती परीक्षा द्यायची? आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दुसरी कोणती परीक्षा आहे का याची चौकशी केली नसेल का? असा प्रश्न आता परीक्षार्थी विचारत आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आता राज्यभर घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी आता पुन्हा ही आरोग्य भरतीची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने पुन्हा एकदा राज्य शासनाचा सावळा गोंधळ कशा प्रकारे सुरु आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या