मालिका जिंकली पण अब्रू घालवली

टीम महाराष्ट्र देशा : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. फलंदाजांच्या हाराकिरीमुळं भारताचा डाव अवघ्या ९२ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १५ षटकांतच भारतावर विजय मिळवला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी दाणादाण उडविली. बोल्टने सलग 10 षटकं टाकत 21 धावांत पाच फलंदाजांना माघारी पाठवले. ग्रँडहोमने 26 धावांत 3 बळी घेतले. त्यामुळे भारताचा संपूर्ण संघ 30.5 षटकांत 92 धावांत तंबूत परतला.

न्यूझीलंडकडून रॉस टेलर नाबाद 37 आणि निकोल्सने नाबाद 30 धावा केल्या.अवघ्या 14.4 षटकात न्यूझीलंडने केवळ दोन विकेट्सच्या मोबदल्यात हा सामना जिंकला.तर भुवनेश्वरने मार्टिन गप्टील आणि कर्णधार विल्यमसन यांना बाद करुन, भाराताला दोन विकेट्स मिळवून दिल्या.