अयोध्या प्रकरण : सुनावणी गेल्या २५ वर्षांपासून रखडल्याबद्दल SCनं व्यक्त केली नाराजी

टीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी गेल्या २५ वर्षांपासून रखडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं, केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयाला सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे आज करण्यात आली, त्यावेळी न्यायालयानं या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह भाजप तसंच हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात हा खटला सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी रायबरेली इथल्या विशेष न्यायालयाऐवजी, लखनऊच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या.